Thursday 13 June 2019

'पुल'कित

आपण हे वर्ष पुलंचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं करतोय. जगभरात पुलंचा गौरव करणारे अनेक कार्यक्रम होत आहेत. पुलंवर चरित्रपटसुद्धा आला. पुलं हे असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे की, त्यांच्या कर्तृत्वाची कितीही स्तुती, वाहवा, प्रशंसा केली, तरी कमीच आहे !

पी.जी. वूडहाऊस यांच्या निधनानंतर लिहिलेल्या लेखात पुलंनी म्हटले होते, "त्या दिवशी मी वूडहाऊसचे पुस्तक उघडले. पहिल्या परिच्छेदातच हसू फुटले. पण हसता हसता डोळ्यांत पाणी आलं. ते पाणी केवळ हसण्यामुळे आलं असं मात्र नाही."

'संवेदनशील लेखक', 'संवेदनशील लेखक' असे म्हणून खूप लेखक स्वतःचा गवगवा करतात. पुलंना मात्र विनोदी लेखकांच्या यादीत टाकतात. ज्यांनी पुलंचं लेखन 'खरंच' वाचलंय (उगीच पु.ल. देशपांडे माझे आवडते लेखक आहेत हे सांगण्यापुरतं नुसत्या ध्वनिफिती ऐकलेले नाही) तेच जाणतात कि पुलंनी वूडहाऊसबद्दल जे लिहिलंय ते त्यांच्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा १००% लागू होतं.

"डॅडी मला खाली खांद्यांवरून घेऊन जायचे !"
त्या थडग्याकडे पाहत नंदा मला सांगत होता. "आणि आम्ही समुद्रात दगड फेकत होतो. ही वॉज ए नाइस सोल." नंदाने हे वाक्य उच्चारताना त्या थडग्यावरून असा काही हात फिरवला की, माझ्या अंगावर सर्रकन शहारा आला !

'नंदा प्रधान'मधला हा परिच्छेद वाचताना पुलंच्या आला तसा जर तुमच्या अंगावर सर्रकन शहारा नाही आला तर कुठली संवेदनशीलता आणि कुठली हृदयद्रावकता ! 

फक्त नंदा प्रधानच नाही तर अश्या अनेक वल्ली आहेत ज्या श्रावणातल्या ऊन-पावसासारख्या आहेत. विनोदाच्या कोवळ्या उन्हात हिंडत असताना कधी पटकन डोळे पाणावतात हे कळतही नाही. पुलंना त्या अपार वल्लींमधले व्यक्ती उमजले, अनेक असामींमधला तो 'असा मी' भावला.

नंदा प्रधानप्रमाणे अनेक उदाहरणं आहेत जेव्हा तुम्ही पोट धरून हसता हसता चटकन हळवे होता.

मुकुंदाच्या पोलिओ असलेल्या लहान मुलीला जेव्हा 'चितळे मास्तर' दोन्ही हात पसरून राजपुत्राच्या विमानाची गोष्ट सांगतात तेव्हा मुकुंदाबरोबर आपल्याही डोळ्यांत पाणी तरारून येतं.

लग्नात डोकं गमावलेल्या मुरारबाजीसारखं थैमान घालणारा 'नारायण' सुमीला निरोप देताना जेव्हा इंग्रजीचा आधार घेतो तेव्हा नारायणाबरोबर आपणही पटकन डोळे पुसतो. लग्न संपल्यावर कोचावर मुटकुळी करून झोपलेल्या नारायणाकडे कोणाचंच लक्ष जात नाही. पण आपल्या मनाला मात्र चुटपुट लागून जाते.

"छे हो. काळोख आहे ते बरा आहे ! उद्या झकपक प्रकाश पडला तर बघायचं काय ? दळिद्रच ना ? अहो, पोपडे उडालेल्या भिंती नि गळकी कौलं बघायला वीज हो कशाला ? आमचं दळिद्र काळोखात दडलेलं बरं !" हे वाचताना आणि 'अंतूशेठनी' सदरा वर करून आपले म्हातारे मिचमिचे डोळे पुसल्यावर, आपले डोळे नकळत आपण पुसतो.

'हरितात्यांच्या' "काय उपयोग आहे दिल्लीला येऊन - डोळे गेले ! आता आतल्या आत पाहत असतो... " हे वाचताना किंवा 'बबडूच्या' आईची गोष्ट ऐकताना मन सुन्न होऊन जातं.

चाळीच्या चिंतनात जेव्हा चाळ "अरे नाही रे, माझ्या पोटात ह्यापेक्षा खूप खूप माया होती !" हे किती पोटतिडकीने म्हणते ! 'धोंडो भिकाजी जोशी' जेव्हा बाबांची आठवण म्हणून त्यांचं जुनं घड्याळ अजून वापरतात तेव्हा पुलंचे शब्द मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी घाव करून जातात. "खिशातून घड्याळ काढलं की वाटतं, जुन्या काय नि नव्या काय, घड्याळाच्या तबकड्या नि पट्टे बदलतात - सुखाने टळलेली दुपार पाहायला तबकडी अन पट्टे करायचे आहेत काय ? घड्याळाचं काय आणि माणसांचं काय, आतलं तोल सांभाळणारं चाक नीट राहिलं की फार पुढंही  जाण्याची भीती नाही नि फार मागंही पडण्याची नाही !"

आज १२ जून २०१९. पुलंना जाऊन १९ वर्ष झाली. पुलंचा जन्म होऊन १०० वर्ष झाली. इतका काळ लोटला तरी पुलंचं लेखन अजूनही चिरतरुण आहे. शेवटी अजरामर ते अजरामर.

पुलंनी मला खूप काही दिलं, खूप काही शिकवलं. आता पुलंच्याच शब्दांत सांगायचं तर,
"जुन्यात आपण रंगतो... स्मृतींची पानं उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागतं. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या."

पुलंचं लिखाण म्हणजे आनंदी स्मृतींचा खजिना आहे. जेवढा खजिना गोळा करता येईल तेवढा करून घ्यायचा. कारण भविष्यात कधी पाठीला डोळे फुटतील आणि त्यांत काचांच्या फुटक्या तुकड्यांत खूप प्रतिबिंब लक्षात यावी तश्या ह्या स्मृतीं दिसायला लागतील. एखाद्या उदबत्तीच्या वासाप्रमाणे, एखाद्या नव्या कोऱ्या छत्रीवरच्या पावसाच्या पहिल्या थेंबाप्रमाणे ह्या स्मृती नक्की मनाला मागे घेऊन जातील. 

Thursday 9 February 2017

माझ्या मुलाला क्रिकेट कसं समजावून सांगू?

भारतीयांना परदेश गमन हे एका मादक अप्सरेसारखं वाटतं. नऊ वर्षांपूर्वी, मी सुद्धा फासे टाकले आणि हिंदी महासागर ओलांडून ऑस्ट्रेलियात स्थायिक झालो. जागा बदलली तरी स्वभाव बदलला नाही. क्रिकेटशी माझी नाळ जोडलेलीच राहिली. क्रिकेट ह्या खेळाविषयीचं प्रेम बहुदा आपल्या भारतीयांच्या डी.एन.ए. मध्येच आहे. अनुवांशिक आहे ते, जे पिढ्यानपिढ्या पुढे सरकत आलंय. पहिल्यांदा जेव्हा आपण बॅट किंवा बॉल हातात घेतो आणि त्या क्षणापासून आपण जे प्रेमात पडतो, ते प्रेम दाखवणं यश चोप्रा किंवा करण जोहरला पण जमणार नाही. "LOVE AT FIRST SIGHT' चे ह्यापेक्षा चांगले उदाहरण जगात नाही. गेली २५-२६ वर्ष क्रिकेटचा निस्सीम भक्त मी एका नव्या भूमिकेत शिरलो आणि काही महिन्यांपूर्वी बाबा झालो. बाप झाल्यापासून मी विचार करतोय कि, आपली भारतीयांची हि क्रिकेट विषयीची आस्था माझ्या ऑस्ट्रेलियात जन्माला आलेल्या मुलाला कशी समजावून देऊ.

शक्यतो, प्रत्येक भारतीय मुलाची स्पर्धात्मक क्रिकेटशी ओळख म्हणजे गल्ली क्रिकेट. एकाच मैदानात चाललेल्या अनेक मॅचेस, प्रत्येकाचं एकचं ध्येय - जिंकणे, कारण जिंकलेल्या टीमला पुढच्या मॅचला पहिली बॅटिंग मिळते. ट्रायल बॉल, एक टप्पा आऊट, कॉमन मॅन, काच फुटली तर आऊट, फेकी बॉलिंग आणि ह्या सारख्या अनेक गोष्टींना आम्ही जवळ केलं.

प्रत्येक पिढी क्रिकेटचा आस्वाद त्या त्या वेळच्या विशिष्ट अनुभवांवरून घेते. काहींना अजूनही जॉन अर्लोटची स्पष्ट कॉमेंटरी आठवत असेल, कोणाकडे स्वाक्षऱ्या मिळवण्यासाठी केलेल्या धडपडीचा गोष्टी असतील. स्टेडियममध्ये असतांना बहुतेक आपण सगळ्यांनीच बॉल आपल्या दिशेने यावा म्हणून मनातल्या मनात प्रार्थना केलीच असेल.

माझेही स्वतःचे अनुभव आहेत. मी सुनील गावसकरची बॅटिंग कधी बघितली नाही. कसं त्याने हेल्मेटशिवाय वेस्ट इंडियन फास्ट बॉलर्सचा सामना केला हे फक्त ऐकलंय किंवा वाचलंय. कपिल देवने मागे धावत जाऊन व्हिव रिचर्ड्सचा कॅच माझ्या जन्माच्या दोन वर्ष आधी घेतला. भारताचा पहिला वर्ल्डकप विजय पण मी अनुभवला नाही. जेव्हा मी बॅट धरायला शिकत होतो तेव्हा परदेशात टूर करताना भारत टेस्ट आणि वन डे दोन्हीमध्ये बिचकत बिचकत खेळत होता. मी त्या काळात मोठा झालो जेव्हा वन डे मध्ये २२० स्कोर केल्यावर टीम निवांत असायची.

मला क्रिकेट कळायला लागल्यापासून काही वर्ष भारतीय टीमच्या सामान्य कामगिरीने नाखुषच होतो. आणि मग अवतरला सचिन तेंडुलकर. आपण, क्रिकेटवेड्या भुकेल्या भारताने त्याला गिळून टाकला. त्याने केलेल्या प्रत्येक रनची माहिती आपल्याला होती आणि त्यात आपण प्रचंड भाव खाल्ला. त्याच्या बॅटिंगने सगळं क्रिकेट जगत हलवून टाकलं.

२१ व्या शतकाच्या सुरुवातीला झालेल्या मॅच फ़िक्सिन्ग प्रकरणांनी प्रत्येक क्रिकेट चाहता हादरला. GENTLEMEN'S GAME म्हणत म्हणत जाणारी ट्रेन रुळावरून घसरली होती. प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाबद्दल शंकेची पाल चुकचुकत होती. माझ्यासारख्या क्रिकेट भक्ताला प्रचंड चीटिंग केल्यासारखं झालं. हे म्हणजे समोरच्या बॅट्समनने आपल्याला एक रन काढण्यासाठी बोलवायचं, पण आपण अर्ध्यावर असताना जोरात NO म्हणायचं आणि आपण परत मागे क्रीजमध्ये पोचेपर्यंत फिल्डरने येऊन बेल्स उडवायच्या असं काहीतरी झालं.

क्रिकेट म्हणजे आठवणींचं एक पोतडं आहे - रडवणारे पराभव, आनंदाश्रू आणणारे विजय आणि नखं कुरतवडणाऱ्या उत्कंठावर्धक मॅचेस! कसं एका बंगाली प्रिन्सने लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये शर्ट गरागरा फिरवला होता, कसं दोन शांत, मृदू भारतीय बॅट्समननी अख्खा दिवस इडन गार्डन्सवर बॅटिंग करून अख्खी मॅच फिरवली होती, राऊंड द विकेट येऊन लेग स्पिन टाकणाऱ्या शेन वॉर्नला लेग स्टम्पच्या बाहेर स्टेप-आऊट करून कसं सचिनने शारजाला मैदानाबाहेर भिरकावून दिलं होतं (टोनी ग्रेगची ती कॉमेंटरी!). धोनी, विराट ह्या नवीन क्रिकेट देवांचा उदय आणि त्यांनी दिलेला तो च आश्वास आणि आपण टाकलेला तो च निश्वास! हे सगळं प्रचंड, अद्भुत आहे!

माझ्या मुलाची क्रिकेटशी ओळख हि खूप वेगळी असेल बहुदा इकडे. ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट लोकप्रिय आहे पण जेवढा त्यांचा 'फूटी (ऑस्ट्रेलियन रुल फुटबॉल)' लोकप्रिय आहे तेवढा नाही. तो, जो क्रिकेटबरोबरचा रोमान्स आहे तो इकडे नाही. ऍशेसचा इतिहास प्रचंड आहे. ब्रॅडमन, ट्रम्पर, चॅपल, वॉ, पॉन्टिंग इत्यादींची पुण्याईही आहे. पण तो जुनून, वेडेपणा नाही. ते मॅच जिंकल्यावर रस्त्यावर येऊन नाचणं, फटाके लावणं, उन्हाळ्याच्या सुट्टीत सकाळी ७ ते संध्याकाळी ७ नुसतं क्रिकेट खेळणं नाही. त्यामुळे जरा चिंता वाटते. जे आपण अनुभवलंय ते किती अद्भुत आहे आणि तेच ह्या पुढच्या पिढीला अनुभवायला मिळेल का नाही याची भीती वाटते.

त्रिशतक मारणं किंवा हॅट्रिक घेणं हे किती कमाल आहे. १९९९ साली कसं साऊथ आफ्रिकेने १ कॅच नाही तर अख्खा वर्ल्डकप ड्रॉप केला. लेग स्टॅम्पच्या बाहेर टप्पा पडलेला एक साधा लेग स्पिन 'शतकातला सर्वोत्कृष्ट बॉल' कसा झाला. डकवर्थ-लुईस अजून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. बिली बोवडेनच्या वाकड्या बोटाची शप्पथ मला कळतंच नाहीये कि, २०१३ मध्ये सचिनने वानखेडे पीचला वाकून नमस्कार केल्यावर प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात टचकन पाणी का आलं हे मी माझ्या मुलाला कसं समजावून देऊ? हे काम जेवढं रोमांचक आहे तेवढंच घाबरवणारं पण आहे. जास्त घाबरवणारं बहुतेक.

क्रिकेटचं भविष्य खूप उज्ज्वल आहे, मुख्यतः भारतात. गोऱ्या साहेबाचे करमणुकीचे साधन ते भारतातल्या अनेक धर्मांपैकी सर्वात मोठा धर्म. इंडिया इंडिया म्हणत सगळ्यांना एकत्र आणणारा आणि मुंबई इंडियन, चेन्नई सुपरकिंग, नाईट रायडर इत्यादी करत भांडणं लावणारा सुद्धा. मनोरंजक विरोधाभास आहे हा! विलक्षण असा हा क्रिकेटचा खेळ आणि विलक्षण त्याचा तो इतिहास! कसं सांगू मी माझ्या मुलाला? सुरुवात कुठून करू? 

Wednesday 10 July 2013

जात्यावरील ओव्यांच्या परंपरेतून...

वारीच्या वाटेवर जोरदार पाऊस होता. त्यामुळे अंगात खोळ घालून वारकऱ्यांची पावले पुढे पडत होती. पावसातही हरिभक्तीचा कल्लोळ जराही कमी झालेला नव्हता. पावसामुळे माळरानावरील खाच-खळगे पाण्याने भरून वाहत होते. नांगरलेल्या शेतांमध्ये चिखल झाला होता. अशा वातावरणात पुढे जात असताना महिला वारकऱ्यांसोबत चालणारी एक वयोवृद्ध माउली काहीतरी गुणगुणत पुढे चालली होती. शब्द स्पष्ट कळत नव्हते, पण ही माउली पावसावर काहीतरी म्हणते आहे, हे कळाले. ते शब्द त्या माउलीलाच विचारावेत म्हणून, ‘‘माउली, काय म्हणताय ते सांगा की जरा’’ असा प्रश्न केला. त्यावर ती गरीब माउली हसली अन् तोंडावर पदर धरून म्हणाली ‘‘म्हन्ते आपलं काहीबाही,’’ जरा जास्तच आग्रह केल्यानंतर ते शब्द तिने पुन्हा गुणगुणले.
पाऊस पडला, चिखुल झाला;
भिजला हरीचा विणा,
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा..! 
अशा त्या ओळी होत्या. त्या कुणी लिहून दिलेल्या नव्हत्या किंवा तिने त्या पाठही केलेल्या नव्हत्या. पडलेला पाऊस व त्यामुळे निर्माण झालेली स्थिती अन् त्यात चाललेली विठ्ठलाची भक्ती, अशा वातावरणात आपोआपच या माउलीच्या मुखातून या ओळी बाहेर पडल्या होत्या. अशिक्षित असलेली ही माउली जे काही म्हणत होती, ते तिच्यापुरतेच मर्यादित व केवळ तिच्याच आनंदासाठी होते. पण, त्यातून काहीतरी निर्माण होते आहे, हे तिच्या गावीही नव्हते. पंढरीच्या वाटेवर चालताना अशा अनेक ओळी प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांकडून गुणगुणल्या जातात. पूर्वी भल्या पहाटे उठून महिला जात्यावर दळण दळीत होत्या. विजेवर चालणाऱ्या पिठाच्या गिरण्या आल्या अन् घरातले जाते शहरांतील वस्तुसंग्रहालयात आले. या बदलामुळे जात्यावरची मौखिक साहित्याची नवनिर्मितीही थांबली. पण, जात्यावर नसली तरी ही मौखिक साहित्याची परंपरा वारीच्या माध्यमातून आजही टिकून आहे.
‘चला एखादी ओवी म्हणा,’ असे सांगितले म्हणून ओवी तयार होत नव्हती. जाते गरगर फिरायला लागले, की त्याबरोबरीने शब्दही आपसूकच बाहेर पडत होते. तसाच प्रकार वारीच्या वाटेवरही आहे. भक्तिभावाने पंढरीच्या वाटेवर चालत असताना या महिलांच्या मुखातून अनेक ओळी आपोआपच बाहेर पडतात. िदडीची रचना लक्षात घेतली, तर पुढे पुरुष मंडळींचे टाळ-मृदंगांच्या गजरात अभंग सुरू असतात. तर त्यांच्यामागे वृंदावन, पाण्याचा हंडा व साहित्याच्या पिशव्या डोक्यावर घेऊन महिला चालत असतात. मागे चालत असताना या महिला वेगळेच काही गुणगुणत असतात. प्रामुख्याने खांदेश, विदर्भ, मराठवाडय़ातून आलेल्या िदडय़ांमध्ये हे दिसून येते. जात्यावरील ओव्यांमध्ये प्रामुख्याने माहेर, तेथील माणसे, सासर, संसार आदी विषय होते.
विठू राजा माझा बाप;
माय झाली रखुमाई
माहेराला जाता जाता;
 सुख भेटे ठायी ठायी 
यांसारख्या अनेक ओळींमधून पंढरीच्या वाटेवरही माहेराची गोडी दिसून येते. सुखाच्या ओव्यांबरोबर जात्यावर बसणारी माउली आपले दु:खही मांडत होती.
पंढरीला जाईन,
तिथं मागणं मागीन
तुझी करीन मी सेवा,
भोगं सरू दे गा देवा
पंढरीनाथाच्या आनंदमय भक्तीबरोबरच काही वेदनाही अशा स्वरूपात बाहेर पडत असतात. अशा अनेक ओळी हजारो माउलींनी मनात जपून ठेवल्या आहेत. वारीच्या वाटेवर त्या नवनवे रूप घेऊन मुखातून बाहेर पडतात. वारीला कितीही आधुनिकता आली असली तरी हा जुना बाज टिकून असल्यानेच आजही वारीतील गोडी कायम आहे.

लोकसत्ता, १० जुलै २०१३ 

Saturday 6 October 2012

माया


रोजच्या सारखं ८४ नंबरची बस पकडून वेलिंगटन बस स्थानकावर उतरलो. त्यानंतर लाल मांजर (Red Cat) पकडायला उभा होतो. त्या स्थानकावर एक आजोबा (अंदाजे ७०-७५ वर्षाचे - म्हणून आजोबा म्हटलं, नाहीतर इकडचे ६० वर्षाचे लोकही स्वत: ला अतीच तरुण समजतात) बाजूला बसले होते. थोड्या वेळाने मला लक्षात आलं  कि आजोबा हळू हळू  रडत होते. २ मिनिटं मला कळलंच नाही कि त्यांना काय होतंय? 

आता इथे काही लोकांचं असं असतं कि त्यांना दुसऱ्यांनी उगीच त्याच्या भानगडीत लुडबुड केलेली आवडत नाही. पण तरीहि बाजूला कोणी हुंदके देत रडत असेल तर बघवत नाही. त्या आजोबांच्या बाजूला अनेक लोकं होती पण कोणीही ढुंकूनही बघत नव्हतं. "आपण बरं आणि आपलं काम बरं" असं काही झालंच नाही आहे असं आविर्भाव दाखवत होती. 

मग मी त्या आजोबांकडे गेलो आणि त्यांच्याशी संवाद साधला. संवाद इंग्रजीमध्ये होता पण त्याचं मराठी अनुवादन. 

मी: नमस्कार सर, तुम्ही ठीक आहात ना?

आजोबा: नमस्कार. हो ठीक आहे. म्हणजे बहुतेक ठीकच आहे?

मी: काही समस्या असल्यास मला कृपया सांगा. मी काही मदत करू शकतो का? 

आजोबा: हो थोडी समस्या आहे. तसं म्हटलं तर तुला काय सांगू. आपलेच दात आणि आपलेच ओठ (My Life, My Sorrow). मला रॉयल पर्थ इस्पितळात जायचं आहे आणि मला कळत नाही मी कसा जाऊ. 

मी: हात्तीच्या! येव्हडच ना! मी सोडतो तुम्हांला. मी सुद्धा त्याच स्थानकावर उतरणार आहे. 

आजोबा: खरंच!! तू माझी मदत करणार? नक्की? कारण माझ्या रक्त तपासणीसाठी माझं स्वत:चं रक्त यायला तयार नव्हतं (For my Blood Test my own blood wasn't ready to come). 

ते शेवटचं वाक्य ऐकून त्या आजोबांनाच मला समजवावं लागेल कि काय असं मला वाटायला लागलं. त्या ५-१० मिनिटात माझे आई-बाबा माझ्या डोळ्यांसमोर येवून गेले. डोळ्यांत खरोखर पाणी तरारलं. 

वृद्ध आई-वडिलांची काळजी न घेणं कि काही जगाला नवीन नाही. त्याची अनेक उदाहरणं आहेत. पण त्याहून अधिक मला जर काही लागलं असेल ते म्हणजे इकडच्या रस्त्यावरील लोकांचा यांत्रिकिपण. बाकी कसाहि असू दे माझा भारत-देश, पण या बाबतीत मी अगदी ठामपणे सांगू शकतो कि, जर कोणी रस्त्यावर अथवा इतर सार्वजनिक ठिकाणी रडत असेल तर पानवाल्यापासून सगळेजण मदतीला धावतात. आणि हे मी स्वानुभवावरून सांगतोय. आज त्या आजोबांच्या मदतीला मी होतो म्हणून ते तरले असं मला मुळीच म्हणायचं नाही आहे. मी नसतो तर दुसरं कोणीतरी असतं. पण बाकीच्या १०-१५ लोकांचं काय? आयुष्यभर बघ्याचीच भूमिका करत बसणार का? 

देश प्रगत झाला, माणसं प्रगत झाली. पण खरंच प्रगती झाली आहे का? माया, जिव्हाळा आपुलकी हे शब्द विरून तर नाही ना जाणार?


टीप: वर घडलेली घटना हि ०५ ऑक्टोबर २०१२ रोजी माझ्याबरोबर घडलेली खरी घटना आहे. जाता जाता आजोबांचा नाव पण सांगून जातो - श्री. मार्क जोन्स. 

Tuesday 11 September 2012

आई...

शीर्षक वाचून असा वाटेल कि "आई"बद्दल पोस्ट लिहिलेली असेल. पण तसं नाही आहे. आई आहे - पण वेगळी आई.
 
सध्या हापिसात सगळ्यांचं काम मीच करतोय असं वाटतंय. सकाळी ७:३० ला सुरु करून रात्री थेट ९:०० वाजता घरी. हे म्हणजे अगदीच लाजिरवाणं आहे. माझ्यासारख्या अति-आळशी माणसाला इतकं १२-१३ काम करणं शोभत नाही. अश्या वेळी दुपारी जेवण झालं कि डोळे गपागप मिटायला लागतात.
 
पूर्वी कालेजात लाल बैल (रेड बुल) घ्यायचो. पण ते पिवून अगदी बैलोबासारखा झोपायचो. लाल बैल झालं, काफी झाली तरी काही फरक पडायचा नाही. झोप हि माझी अति-आवडती गोष्ट अगदी नको त्या वेळी यायची.
 
हापिसात लाल बैल परवडणारा नव्हता (खर्चाच्या बाबतीत नव्हे, झोपेच्या बाबतीत). मग दुसऱ्या उर्जा स्त्रोतांच्या शोधात लागलो. असाच शोधात असताना आई दिसली. त्यावर "सर्व उर्जा स्त्रोतांची आई" असं पण लिहिलेलं होतं. म्हटलं चला लाल बैलाची लाथ काही नीट लागत नाही, आईकडून लाथ खाऊन बघूया. आणि ती लाथ खरोखरी खऱ्या आईसारखी जबरदस्त बसली. ५०० मिली आईच्या लाथेने ३-४ तास सहज (झोप आल्याशिवाय कसे काय हे मला अजून कोडं आहे) जायला लागले. आता लाल बैल, आई ह्यांचा माझ्या कामावर काही परिणाम होतो कि नाही माहित नाही, पण डोळे मात्र उघडे रहातात. दिवसाला ५०० मिलीच लाथ हे सूत्र मात्र मी पाळतो (तसं लिहिलेलं आहे).
 
तर हि आहे काफिन, तौरिन, गुराना (गुरांना नाही) यांनी युक्त हापिसात झोप आली कि लाथ देणारी आई. 

 

 
 
(टीप: उगीच हापिसात काही कामं नसताना केलेले हे उद्योगधंदे आहेत.)
 

Wednesday 29 February 2012

विडंबन


असंच काही दिवसांपूर्वी मराठीमधील एका प्रसिद्ध गाण्याचं विडंबन सुचलं. 

प्रसिद्ध गाणं आहे - खेळ मांडला (चित्रपट - नटरंग) 


ह्या गाण्याची चाल तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेलच. जर नसेल तर वरच्या संकेत-स्थळावर (link) गाण्याचे बोल आणि YouTube चित्रफित (Video) आहे. हे जे खाली विडंबन आहे ते त्याच चालीत म्हटलं तर त्याची मजा आहे. 


भात सांडला...

दोन वाट्या तांदूळ आणि ४ वाट्या पाणी
त्याच्याबरोबर खायला तूप आणि लोणी
कुकर ठेवला गॅसवर नी बघत राहिलो टी.व्ही. 
शिट्ट्या झाल्या पंधरा आणि भात उतू जाई
सगळेजण वाट पाहत होते जेवणाची 
पण माझा हात फाटका...
भात सांडला, सांडला, सांडला
आई... भात सांडला. 

सांडला गं डाळ-भात कारट्या तू सगळा 
तूच कर जेवण आता भात सांडला
दे रे देवा अक्कल, असा कसा हा वेंधळा
ह्या किचनच्या उंबऱ्यात भात सांडला 

फुस्फुसली शिट्टी भरपूर, उडाला भात सगळा
ओघळली भुईवर डाळ, कुकरही झाला काळा
फडकं घे पुसायाला, साबण आणि पाणी घे 
भाताचं ते एक-एक शित नीटपणे टीप्पून घे 
वाया गेलं जेवण, सगळे झाले कासावीस 
शेवटी मग आले बाबा...
मला हाणला, हाणला, हाणला 
कारण... भात सांडला.

 - पुष्कर कुलकर्णी 

Saturday 12 November 2011

स्वप्न : ‘रिसर्च हब’चे!

आपल्याकडे संशोधक वृत्ती अभावानेच आढळून येते. कुठल्याही राष्ट्राच्या विकासात विविध ज्ञानशाखांतील संशोधनाचे स्थान अनन्यसाधारण असते, हे लक्षात घ्यायला हवे. भारताचा विकास अधिक वेगाने व्हावयास हवा असेल तर आपला देश ‘रिसर्च हब’ बनला पाहिजे.

तीन दशकांआधी कुणाला अंदाजही करता आला नसता इतक्या झपाटय़ाने भारताची आर्थिक स्थिती सुधारली आहे. अर्थात ही प्रगती काही मर्यादित क्षेत्रांपुरतीच सीमित आहे, हेही तितकेच खरे. आर्थिक सुबत्तेसाठी आपल्या देशाला तंत्रज्ञानाच्या विकासातली व्यापकता वाढवावी लागेल आणि ज्या क्षेत्रात आपण कमी पडतो, तिथली कसर भरून काढली पाहिजे. आतापर्यंत आपण माहिती-तंत्रज्ञान, आऊटसोर्सिग आणि कन्सल्टन्सी या क्षेत्रांत बऱ्यापैकी बाजी मारलेली आहे. परंतु जागतिक आर्थिक क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी देशांतर्गत विविध तंत्रज्ञानांचा उदय व विकास व्हायला हवा आणि ही तंत्रे आर्थिक क्षितिजावर झळकायला हवीत; तेव्हा कुठे आपला देश संशोधनाचे कार्यक्षेत्र (रिसर्च हब) बनू शकेल.

संशोधन संस्थांमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना नवीन संकल्पनांची जाणीव नसली की ते परंपरागत मूल्यांचा आधार घेतात. त्यामुळे तिथे नवीन रक्ताला वाव मिळणे दुर्मीळ होते. भारतीय परंपरेनुसार ज्येष्ठांप्रती आदर हा घटकसुद्धा इथे ठाण मांडतो, तसेच प्रस्तावित योजनेचे काही बरेवाईट झाले की शासकीय अधिकारी हात झटकून मोकळे होतात. वास्तविक तरुणाईला संधी मिळाली तर ते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चमत्कार घडवून आणतात, हे वारंवार सिद्ध झालंय.

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेत अणुबॉम्बची निर्मिती आणि वापर झाला. अणुविभाजनाचा अभ्यास करण्यासाठी गणित, भौतिक, रसायन, अभियांत्रिकी या विषयांतील डोकी एकत्र यायला लागतात. अमेरिकेत तेव्हा तशी यंत्रणा होती. मात्र, जर्मनीत हे सगळेजण स्वतंत्रपणे काम करीत होते. त्यामुळेच त्यावेळी अणुतंत्रज्ञानात अमेरिकेची सरशी झाली होती. आजघडीला गतिमानतेने विकसित होत असलेल्या जीवतंत्रज्ञानाचीही तीच गत आहे. संगणकीय गणितांच्या आधारे हे क्षेत्र अजून घोडदौड करणार आहे आणि रसायन व भौतिकशास्त्राच्या आधारे नावीन्यपूर्ण मायक्रो प्रोसेसरची उत्क्रांती होत राहणार आहे. अशा प्रकारे व्यापक दृष्टिकोनातून कार्यरत असणाऱ्या संशोधन संस्था नवनवे नि उपयुक्त शोध मानवतेपुढे पेश करीत राहतील. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड, हार्वर्ड- एम. आय. टी., डय़ुक- यू. एन. सी. यांच्यासारखी विश्वविद्यालये ही नव्या युगातील र्सवकष संशोधन मंदिरांची उदाहरणे होत.

या संशोधन संस्थांतून उत्सर्जित होणाऱ्या ज्ञानाचा औद्योगिक क्षेत्रात सर्रासपणे वापर होणे हेही तितकेच निकडीचे ठरते. ज्ञानवृद्धी झालेले मूलभूत, मौलिक संशोधन हेच तर प्रात्यक्षिक नि फायदेशीर उपयोजनांचे मूलस्रोत असते. वैज्ञानिक कुतूहलापोटी निर्माण झालेले विद्युत् चुंबकीय ज्ञान आणि डी. एन. ए.संबंधी प्रसृत झालेली माहिती पुढे संगणक आणि जीवतंत्रज्ञानाचा पाया ठरली. मायकेल फॅरडेला त्याच्या प्रख्यात विद्युत् चुंबकीय विषयावरील व्याख्यानानंतर तेव्हा प्रश्न विचारण्यात आला होता-
‘पण या नव्या क्षेत्राचा फायदा काय?’
‘जन्मलेले लहानगे बाळ तरी काय उपयोगाचे असते?’ त्याने उत्तर दिले होते.

तेव्हा मूलभूत संशोधनाकडे आपल्याकडे जो काणाडोळा होतो, त्यावर डोळ्यांत तेल घालून नजर ठेवण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. परदेशात जाणारे बुद्धिमंतांचे लोंढे थोपवून किंवा त्यांचं परदेशातील ज्ञानप्राप्तीचे व्रत पूर्ण झाल्यावर त्यांना परत मायदेशी बोलावून संशोधनकामात गुंतवायला हवे. उत्तम पगार आणि उच्च प्रकारच्या सोयीसुविधांसोबत त्यांना उचित मानमरातबही मिळायला हवा. डॉ. रघुनाथ माशेलकरांनी आपल्या ‘रीइन्व्हेन्टिंग इंडिया’ या पुस्तकात यासंबंधी ऊहापोह केलेला आहे. तो आठवत असतानाच माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी दिलेला कानमंत्रही लक्षात ठेवण्यासारखा आहे.

विज्ञानाच्या जगात अशक्य असे काही नसतेच. विविध शोधांद्वारे (इन्व्हेन्शन्स आणि डिस्कव्हरीज्) नवनव्या गोष्टींचा उलगडा होत आलेला आहे. आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे आणि प्रयत्नांच्या जोरावर माणसाने विश्वातील विविध बलांना कामास जुंपले आहे. विविध ऊर्जाना आपल्या दासी बनविल्या आहेत. आता पुढची जबाबदारी आपल्या युवक-युवतींची आहे. त्यांनी मने क्रियाशील बनवून त्यांच्यात जिद्दीचा अंगार पेटवायला हवा. संशोधनाद्वारे भविष्याची आवाहने आणि आव्हाने पेलण्याचे स्फुल्लिंग त्यांच्यात पेटायला हवे. तशी वातावरणनिर्मिती आपल्या देशात व्हायला हवी. आपल्याकडील विद्यापीठांचं संशोधन कार्यक्षेत्रात रूपांतर करून, नावीन्याचा आविष्कार करण्यासाठी तरुण मंडळींना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. आपल्याकडे संशोधन संस्कृती अभावानेच आढळते. संशोधनाचा दर्जा जिथे उच्च असतो, तिथले शिक्षणही गुणवत्तापूर्ण असते. तेव्हा युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील विद्वत्जनांवर तरुण बुद्धिमान संशोधकांना आकर्षित करण्याची जबाबदारी येते.

त्यासाठी डॉ. कलाम यांनी दहा टिप्स दिल्या आहेत.
१) तरुण, बुद्धिमान, पण अननुभवी विद्यार्थ्यांना अचूक हेरणे.
२) भूगर्भशास्त्र, भूकंपशास्त्र, आण्विक विज्ञान, विद्युत् चुंबकीय क्षेत्रे या साऱ्यांचा संघटितपणे अभ्यास करून महासंगणकाद्वारे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सुगावा लागण्याचे तंत्रज्ञान शोधण्यास त्यांना प्रोत्साहन देणे.
३) येत्या दोन दशकांत पृथ्वी, चंद्र आणि मंगळ यांच्यात ‘अर्थ’पूर्ण देवाणघेवाण होईल, तेव्हा आपल्या देशाने अंतराळ क्षेत्रात झेप घ्यायला हवी.
४) अंतराळात भ्रमण करायचं म्हटलं तर आज एक किलोग्रॅममागे २०,००० डॉलर्स इतका खर्च येतो. हा खर्च २००० डॉलर्सपर्यंत खाली यावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठविता येतील. संपर्कजाळ्याची व्याप्ती वाढेल आणि त्याद्वारे देशातील दूरवरच्या सहा लाख गावांना जोडणे सोपे होईल. त्यासाठी २०२० सालापर्यंत ग्रामपंचायतींमध्ये फायबर ऑप्टिक्सची सुविधा पोहोचायला हवी.
५) मलेरिया पुन्हा डोके वर काढत आहे. त्याचा समूळ नायनाट व्हायला हवा.
६) क्षय आणि एड्स या रोगांवर रामबाण लस शोधली गेली पाहिजे.
७) भारत खेडय़ांत राहतो. या सहा लाख खेडय़ांत शहरांप्रमाणेच भौतिक, इलेक्ट्रॉनिक आणि ज्ञानाची दालने उपलब्ध करायला हवीत. ‘प्रोव्हिजन ऑफ अर्बन अ‍ॅमेनिटीज इन् रूरल एरियाज्’ (ढ४१ं) ही सरकारी प्रयोजना यशस्वीरीत्या राबविली गेली पाहिजे.
८) सध्या आपण कार्बनयुक्त ऊर्जा वापरतो. त्याद्वारे प्रदूषण घडते. २०३० सालापर्यंत जमीन, आकाश व समुद्रातली वाहतूक विद्युत, जैविक इंधने, सौरऊर्जा किंवा या तिघांच्या संयुक्त वापराने व्हायला हवी.
९) आजकालच्या तरुण मुलांचा ओढा अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा व्यवस्थापन या विषयांकडे जास्त आहे. तिथे जादा पगार मिळतो ना! परंतु या कॉलेज तरुणांना मूलभूत संशोधनाकडे आकर्षित करायला हवे.
१०) पाणी योजना ‘स्मार्ट’ पद्धतीने राबवली जायला हवी.

देशाच्या सार्वभौम विकासासाठी या आणि अशा प्रकारच्या संशोधनाने खचितच हातभार लागेल आणि जनतेच्या सौख्यात भर पडेल. हे राष्ट्रीय आवाहन आपणा सर्वाना पेलायचे आहे.

- जोसेफ तुस्कानो (लोकरंग, ६ नोव्हेंबर २०११)