Saturday, 12 November 2011

स्वप्न : ‘रिसर्च हब’चे!

आपल्याकडे संशोधक वृत्ती अभावानेच आढळून येते. कुठल्याही राष्ट्राच्या विकासात विविध ज्ञानशाखांतील संशोधनाचे स्थान अनन्यसाधारण असते, हे लक्षात घ्यायला हवे. भारताचा विकास अधिक वेगाने व्हावयास हवा असेल तर आपला देश ‘रिसर्च हब’ बनला पाहिजे.

तीन दशकांआधी कुणाला अंदाजही करता आला नसता इतक्या झपाटय़ाने भारताची आर्थिक स्थिती सुधारली आहे. अर्थात ही प्रगती काही मर्यादित क्षेत्रांपुरतीच सीमित आहे, हेही तितकेच खरे. आर्थिक सुबत्तेसाठी आपल्या देशाला तंत्रज्ञानाच्या विकासातली व्यापकता वाढवावी लागेल आणि ज्या क्षेत्रात आपण कमी पडतो, तिथली कसर भरून काढली पाहिजे. आतापर्यंत आपण माहिती-तंत्रज्ञान, आऊटसोर्सिग आणि कन्सल्टन्सी या क्षेत्रांत बऱ्यापैकी बाजी मारलेली आहे. परंतु जागतिक आर्थिक क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी देशांतर्गत विविध तंत्रज्ञानांचा उदय व विकास व्हायला हवा आणि ही तंत्रे आर्थिक क्षितिजावर झळकायला हवीत; तेव्हा कुठे आपला देश संशोधनाचे कार्यक्षेत्र (रिसर्च हब) बनू शकेल.

संशोधन संस्थांमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना नवीन संकल्पनांची जाणीव नसली की ते परंपरागत मूल्यांचा आधार घेतात. त्यामुळे तिथे नवीन रक्ताला वाव मिळणे दुर्मीळ होते. भारतीय परंपरेनुसार ज्येष्ठांप्रती आदर हा घटकसुद्धा इथे ठाण मांडतो, तसेच प्रस्तावित योजनेचे काही बरेवाईट झाले की शासकीय अधिकारी हात झटकून मोकळे होतात. वास्तविक तरुणाईला संधी मिळाली तर ते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चमत्कार घडवून आणतात, हे वारंवार सिद्ध झालंय.

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेत अणुबॉम्बची निर्मिती आणि वापर झाला. अणुविभाजनाचा अभ्यास करण्यासाठी गणित, भौतिक, रसायन, अभियांत्रिकी या विषयांतील डोकी एकत्र यायला लागतात. अमेरिकेत तेव्हा तशी यंत्रणा होती. मात्र, जर्मनीत हे सगळेजण स्वतंत्रपणे काम करीत होते. त्यामुळेच त्यावेळी अणुतंत्रज्ञानात अमेरिकेची सरशी झाली होती. आजघडीला गतिमानतेने विकसित होत असलेल्या जीवतंत्रज्ञानाचीही तीच गत आहे. संगणकीय गणितांच्या आधारे हे क्षेत्र अजून घोडदौड करणार आहे आणि रसायन व भौतिकशास्त्राच्या आधारे नावीन्यपूर्ण मायक्रो प्रोसेसरची उत्क्रांती होत राहणार आहे. अशा प्रकारे व्यापक दृष्टिकोनातून कार्यरत असणाऱ्या संशोधन संस्था नवनवे नि उपयुक्त शोध मानवतेपुढे पेश करीत राहतील. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड, हार्वर्ड- एम. आय. टी., डय़ुक- यू. एन. सी. यांच्यासारखी विश्वविद्यालये ही नव्या युगातील र्सवकष संशोधन मंदिरांची उदाहरणे होत.

या संशोधन संस्थांतून उत्सर्जित होणाऱ्या ज्ञानाचा औद्योगिक क्षेत्रात सर्रासपणे वापर होणे हेही तितकेच निकडीचे ठरते. ज्ञानवृद्धी झालेले मूलभूत, मौलिक संशोधन हेच तर प्रात्यक्षिक नि फायदेशीर उपयोजनांचे मूलस्रोत असते. वैज्ञानिक कुतूहलापोटी निर्माण झालेले विद्युत् चुंबकीय ज्ञान आणि डी. एन. ए.संबंधी प्रसृत झालेली माहिती पुढे संगणक आणि जीवतंत्रज्ञानाचा पाया ठरली. मायकेल फॅरडेला त्याच्या प्रख्यात विद्युत् चुंबकीय विषयावरील व्याख्यानानंतर तेव्हा प्रश्न विचारण्यात आला होता-
‘पण या नव्या क्षेत्राचा फायदा काय?’
‘जन्मलेले लहानगे बाळ तरी काय उपयोगाचे असते?’ त्याने उत्तर दिले होते.

तेव्हा मूलभूत संशोधनाकडे आपल्याकडे जो काणाडोळा होतो, त्यावर डोळ्यांत तेल घालून नजर ठेवण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. परदेशात जाणारे बुद्धिमंतांचे लोंढे थोपवून किंवा त्यांचं परदेशातील ज्ञानप्राप्तीचे व्रत पूर्ण झाल्यावर त्यांना परत मायदेशी बोलावून संशोधनकामात गुंतवायला हवे. उत्तम पगार आणि उच्च प्रकारच्या सोयीसुविधांसोबत त्यांना उचित मानमरातबही मिळायला हवा. डॉ. रघुनाथ माशेलकरांनी आपल्या ‘रीइन्व्हेन्टिंग इंडिया’ या पुस्तकात यासंबंधी ऊहापोह केलेला आहे. तो आठवत असतानाच माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी दिलेला कानमंत्रही लक्षात ठेवण्यासारखा आहे.

विज्ञानाच्या जगात अशक्य असे काही नसतेच. विविध शोधांद्वारे (इन्व्हेन्शन्स आणि डिस्कव्हरीज्) नवनव्या गोष्टींचा उलगडा होत आलेला आहे. आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे आणि प्रयत्नांच्या जोरावर माणसाने विश्वातील विविध बलांना कामास जुंपले आहे. विविध ऊर्जाना आपल्या दासी बनविल्या आहेत. आता पुढची जबाबदारी आपल्या युवक-युवतींची आहे. त्यांनी मने क्रियाशील बनवून त्यांच्यात जिद्दीचा अंगार पेटवायला हवा. संशोधनाद्वारे भविष्याची आवाहने आणि आव्हाने पेलण्याचे स्फुल्लिंग त्यांच्यात पेटायला हवे. तशी वातावरणनिर्मिती आपल्या देशात व्हायला हवी. आपल्याकडील विद्यापीठांचं संशोधन कार्यक्षेत्रात रूपांतर करून, नावीन्याचा आविष्कार करण्यासाठी तरुण मंडळींना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. आपल्याकडे संशोधन संस्कृती अभावानेच आढळते. संशोधनाचा दर्जा जिथे उच्च असतो, तिथले शिक्षणही गुणवत्तापूर्ण असते. तेव्हा युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील विद्वत्जनांवर तरुण बुद्धिमान संशोधकांना आकर्षित करण्याची जबाबदारी येते.

त्यासाठी डॉ. कलाम यांनी दहा टिप्स दिल्या आहेत.
१) तरुण, बुद्धिमान, पण अननुभवी विद्यार्थ्यांना अचूक हेरणे.
२) भूगर्भशास्त्र, भूकंपशास्त्र, आण्विक विज्ञान, विद्युत् चुंबकीय क्षेत्रे या साऱ्यांचा संघटितपणे अभ्यास करून महासंगणकाद्वारे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सुगावा लागण्याचे तंत्रज्ञान शोधण्यास त्यांना प्रोत्साहन देणे.
३) येत्या दोन दशकांत पृथ्वी, चंद्र आणि मंगळ यांच्यात ‘अर्थ’पूर्ण देवाणघेवाण होईल, तेव्हा आपल्या देशाने अंतराळ क्षेत्रात झेप घ्यायला हवी.
४) अंतराळात भ्रमण करायचं म्हटलं तर आज एक किलोग्रॅममागे २०,००० डॉलर्स इतका खर्च येतो. हा खर्च २००० डॉलर्सपर्यंत खाली यावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठविता येतील. संपर्कजाळ्याची व्याप्ती वाढेल आणि त्याद्वारे देशातील दूरवरच्या सहा लाख गावांना जोडणे सोपे होईल. त्यासाठी २०२० सालापर्यंत ग्रामपंचायतींमध्ये फायबर ऑप्टिक्सची सुविधा पोहोचायला हवी.
५) मलेरिया पुन्हा डोके वर काढत आहे. त्याचा समूळ नायनाट व्हायला हवा.
६) क्षय आणि एड्स या रोगांवर रामबाण लस शोधली गेली पाहिजे.
७) भारत खेडय़ांत राहतो. या सहा लाख खेडय़ांत शहरांप्रमाणेच भौतिक, इलेक्ट्रॉनिक आणि ज्ञानाची दालने उपलब्ध करायला हवीत. ‘प्रोव्हिजन ऑफ अर्बन अ‍ॅमेनिटीज इन् रूरल एरियाज्’ (ढ४१ं) ही सरकारी प्रयोजना यशस्वीरीत्या राबविली गेली पाहिजे.
८) सध्या आपण कार्बनयुक्त ऊर्जा वापरतो. त्याद्वारे प्रदूषण घडते. २०३० सालापर्यंत जमीन, आकाश व समुद्रातली वाहतूक विद्युत, जैविक इंधने, सौरऊर्जा किंवा या तिघांच्या संयुक्त वापराने व्हायला हवी.
९) आजकालच्या तरुण मुलांचा ओढा अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा व्यवस्थापन या विषयांकडे जास्त आहे. तिथे जादा पगार मिळतो ना! परंतु या कॉलेज तरुणांना मूलभूत संशोधनाकडे आकर्षित करायला हवे.
१०) पाणी योजना ‘स्मार्ट’ पद्धतीने राबवली जायला हवी.

देशाच्या सार्वभौम विकासासाठी या आणि अशा प्रकारच्या संशोधनाने खचितच हातभार लागेल आणि जनतेच्या सौख्यात भर पडेल. हे राष्ट्रीय आवाहन आपणा सर्वाना पेलायचे आहे.

- जोसेफ तुस्कानो (लोकरंग, ६ नोव्हेंबर २०११)

1 comment: