आपण हे वर्ष पुलंचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं करतोय. जगभरात पुलंचा गौरव करणारे अनेक कार्यक्रम होत आहेत. पुलंवर चरित्रपटसुद्धा आला. पुलं हे असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे की, त्यांच्या कर्तृत्वाची कितीही स्तुती, वाहवा, प्रशंसा केली, तरी कमीच आहे !
पी.जी. वूडहाऊस यांच्या निधनानंतर लिहिलेल्या लेखात पुलंनी म्हटले होते, "त्या दिवशी मी वूडहाऊसचे पुस्तक उघडले. पहिल्या परिच्छेदातच हसू फुटले. पण हसता हसता डोळ्यांत पाणी आलं. ते पाणी केवळ हसण्यामुळे आलं असं मात्र नाही."
'संवेदनशील लेखक', 'संवेदनशील लेखक' असे म्हणून खूप लेखक स्वतःचा गवगवा करतात. पुलंना मात्र विनोदी लेखकांच्या यादीत टाकतात. ज्यांनी पुलंचं लेखन 'खरंच' वाचलंय (उगीच पु.ल. देशपांडे माझे आवडते लेखक आहेत हे सांगण्यापुरतं नुसत्या ध्वनिफिती ऐकलेले नाही) तेच जाणतात कि पुलंनी वूडहाऊसबद्दल जे लिहिलंय ते त्यांच्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा १००% लागू होतं.
"डॅडी मला खाली खांद्यांवरून घेऊन जायचे !"
त्या थडग्याकडे पाहत नंदा मला सांगत होता. "आणि आम्ही समुद्रात दगड फेकत होतो. ही वॉज ए नाइस सोल." नंदाने हे वाक्य उच्चारताना त्या थडग्यावरून असा काही हात फिरवला की, माझ्या अंगावर सर्रकन शहारा आला !
'नंदा प्रधान'मधला हा परिच्छेद वाचताना पुलंच्या आला तसा जर तुमच्या अंगावर सर्रकन शहारा नाही आला तर कुठली संवेदनशीलता आणि कुठली हृदयद्रावकता !
फक्त नंदा प्रधानच नाही तर अश्या अनेक वल्ली आहेत ज्या श्रावणातल्या ऊन-पावसासारख्या आहेत. विनोदाच्या कोवळ्या उन्हात हिंडत असताना कधी पटकन डोळे पाणावतात हे कळतही नाही. पुलंना त्या अपार वल्लींमधले व्यक्ती उमजले, अनेक असामींमधला तो 'असा मी' भावला.
नंदा प्रधानप्रमाणे अनेक उदाहरणं आहेत जेव्हा तुम्ही पोट धरून हसता हसता चटकन हळवे होता.
मुकुंदाच्या पोलिओ असलेल्या लहान मुलीला जेव्हा 'चितळे मास्तर' दोन्ही हात पसरून राजपुत्राच्या विमानाची गोष्ट सांगतात तेव्हा मुकुंदाबरोबर आपल्याही डोळ्यांत पाणी तरारून येतं.
लग्नात डोकं गमावलेल्या मुरारबाजीसारखं थैमान घालणारा 'नारायण' सुमीला निरोप देताना जेव्हा इंग्रजीचा आधार घेतो तेव्हा नारायणाबरोबर आपणही पटकन डोळे पुसतो. लग्न संपल्यावर कोचावर मुटकुळी करून झोपलेल्या नारायणाकडे कोणाचंच लक्ष जात नाही. पण आपल्या मनाला मात्र चुटपुट लागून जाते.
"छे हो. काळोख आहे ते बरा आहे ! उद्या झकपक प्रकाश पडला तर बघायचं काय ? दळिद्रच ना ? अहो, पोपडे उडालेल्या भिंती नि गळकी कौलं बघायला वीज हो कशाला ? आमचं दळिद्र काळोखात दडलेलं बरं !" हे वाचताना आणि 'अंतूशेठनी' सदरा वर करून आपले म्हातारे मिचमिचे डोळे पुसल्यावर, आपले डोळे नकळत आपण पुसतो.
'हरितात्यांच्या' "काय उपयोग आहे दिल्लीला येऊन - डोळे गेले ! आता आतल्या आत पाहत असतो... " हे वाचताना किंवा 'बबडूच्या' आईची गोष्ट ऐकताना मन सुन्न होऊन जातं.
चाळीच्या चिंतनात जेव्हा चाळ "अरे नाही रे, माझ्या पोटात ह्यापेक्षा खूप खूप माया होती !" हे किती पोटतिडकीने म्हणते ! 'धोंडो भिकाजी जोशी' जेव्हा बाबांची आठवण म्हणून त्यांचं जुनं घड्याळ अजून वापरतात तेव्हा पुलंचे शब्द मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी घाव करून जातात. "खिशातून घड्याळ काढलं की वाटतं, जुन्या काय नि नव्या काय, घड्याळाच्या तबकड्या नि पट्टे बदलतात - सुखाने टळलेली दुपार पाहायला तबकडी अन पट्टे करायचे आहेत काय ? घड्याळाचं काय आणि माणसांचं काय, आतलं तोल सांभाळणारं चाक नीट राहिलं की फार पुढंही जाण्याची भीती नाही नि फार मागंही पडण्याची नाही !"
आज १२ जून २०१९. पुलंना जाऊन १९ वर्ष झाली. पुलंचा जन्म होऊन १०० वर्ष झाली. इतका काळ लोटला तरी पुलंचं लेखन अजूनही चिरतरुण आहे. शेवटी अजरामर ते अजरामर.
पुलंनी मला खूप काही दिलं, खूप काही शिकवलं. आता पुलंच्याच शब्दांत सांगायचं तर,
"जुन्यात आपण रंगतो... स्मृतींची पानं उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागतं. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या."
पुलंचं लिखाण म्हणजे आनंदी स्मृतींचा खजिना आहे. जेवढा खजिना गोळा करता येईल तेवढा करून घ्यायचा. कारण भविष्यात कधी पाठीला डोळे फुटतील आणि त्यांत काचांच्या फुटक्या तुकड्यांत खूप प्रतिबिंब लक्षात यावी तश्या ह्या स्मृतीं दिसायला लागतील. एखाद्या उदबत्तीच्या वासाप्रमाणे, एखाद्या नव्या कोऱ्या छत्रीवरच्या पावसाच्या पहिल्या थेंबाप्रमाणे ह्या स्मृती नक्की मनाला मागे घेऊन जातील.

Pushkar good thread on PLs subtle side.
ReplyDelete