अनिल काकोडकर लिखित आणि अनिल पं. कुलकर्णी अनुवादित उत्कृष्ठ लेखलोकसत्ता - बुधवार ८ जून २०११.
जागतिक दर्जाच्या संस्थांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात मोठय़ा प्रमाणावर उच्च दर्जाच्या गुणांचा, ज्ञानाचा समन्वय असतो. कार्यक्षमता, विद्यार्थी, संस्था आणि अतिथी संशोधक, याशिवाय बाहेरील चांगल्या दर्जाच्या संस्थांशी सतत शैक्षणिक आणि संशोधनविषयक समन्वय, साधन-सामग्रीची यथायोग्य उपलब्धता अशी व्यवस्था या संस्थांमध्ये असते. अत्यंत उपयुक्त प्रशासन व्यवस्था ही आणखी एक वैशिष्टय़पूर्ण बाब! विद्यार्थी- संशोधकांमधील नव्या आणि विश्वसनीय कल्पनांची जाण ठेवून त्यांना उत्तेजन देणारी, पाठिंबा देणारी अशी ही प्रशासन व्यवस्था अत्यंत उपयोगी ठरते.
केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्याने भारतातील आय. आय. टी. (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) संस्थांबाबत वाद-चर्चा सुरू झाली आहे. आपल्या देशातील आय. आय. टी. संस्था सुमारे ५० वर्षांपासूनच्या आहेत आणि आय. आय. टी. पदवीधरांना जगभर मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. या पदवीचे मूल्य मोठे आहे हे प्रत्येकजण मान्य करील. आय. आय. टी. संस्था ज्या मूळ उद्देशाने स्थापन करण्यात आल्या, तो या संस्थांनी साध्य केला आहे, हेही निर्विवाद आहे. अर्थात आय. आय. टी. संस्थांमधील संशोधनाचे महत्त्व काहीसे उशिरा लक्षात आले असले तरी आज भारतातील तांत्रिक संशोधन आणि शिक्षण संस्थांमध्ये आय. आय. टी. संस्थांच अग्रणी आहेत हे नाकारता येणार नाही. अगदी जागतिक पातळीवर विचार केला तरी आय. आय. टी. संस्था क्रमवारीत पुढेच आहेत आणि अशा संस्थांना कमी लेखणे किंवा त्यांच्या कामाबद्दल, दर्जाबद्दल असमाधान व्यक्त करणे म्हणजे एकूण संपूर्ण प्रणालीलाच कार्यापासून परावृत्त करणे होय.
अर्थात भारतातील आय. आय. टी. संस्थांच्या कार्यावर नजर टाकल्यानंतर या संस्थांचा दर्जा आहे त्यापेक्षा अधिक वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे हे म्हणजे सयुक्तिकच ठरेल. हे काम करण्यासाठीच्या एका समितीचा प्रमुख म्हणून मला संधी मिळाली होती. त्या कामाचा अहवाल मनुष्यबळ विकास खात्याच्या संकेतस्थळावर (वेबसाइट) उपलब्ध आहे.
भारतासारख्या मोठय़ा देशात, आर्थिक विकास आघाडीवर वेगाने प्रगतीचे टप्पे गाठले जात असताना मोठय़ा प्रमाणावरील तंत्रज्ञानाभिमुख संशोधनावर भर द्यायलाच पाहिजे. ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंदावून नवे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून आजच्या स्पर्धात्मक युगात जागतिक पटलावर भारताचे नाव प्रगती विकासाच्या बाबतीत एक अग्रणी राष्ट्र म्हणून पुढे नेणे क्रमप्राप्त आहे. भारताचा सर्वागीण विकास आणि आर्थिक विकास यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाधारित नवनवे उपक्रम राबविले जाणे तितकेच आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी पीएच. डी. झालेल्या संशोधकांचा मोठा ताफा पाहिजे. आजघडीला अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पीएच. डी.प्राप्त करणाऱ्यांची संख्या आपल्या देशातील लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामानाने अमेरिका आणि चीनमध्ये अशा संशोधकांची संख्या भारताच्या तुलनेत अधिक आहे. भारतात अभियांत्रिकीतील उच्च दर्जाच्या संशोधन आणि विकासात, तसेच उच्च दर्जाच्या मनुष्यबळ विकासात आय. आय. टी. संस्थांचे योगदान मोठे आहे. साहजिकच नवसंशोधनाचे आव्हान पेलणेही त्यांच्यावर आपसूक येऊन पडते. अत्याधुनिक, नवी, संशोधनाधारित तंत्रज्ञान निर्माण करण्याची जबाबदारी ओघानेच त्यांच्याकडे येते. या पाश्र्वभूमीवर पुरेशा किंबहुना मोठय़ा प्रमाणावर, व्यापक संशोधन पायाभूत सुविधा आणि आर्थिक साहाय्याची गरज आहे. देशाच्या सामाजिक आर्थिक विकास प्रगतीसाठी काम करण्याची क्षमता ज्यांच्या ठायी आहे, अशा गटांना पायाभूत सुविधा आणि आर्थिक पाठबळ देण्यात यावे. हे सर्व गट संयुक्तपणे कार्य करतील. याद्वारे आय. आय. टी. संस्थांमध्ये ज्ञानवृद्धीला पोषक वातावरण निर्माण होईल, अशी आशा वाटते. आय. आय. टी., विद्यार्थी आणि बाहेरील जग यांच्यात अत्यंत उपयोगी, उपयुक्त साखळी निर्माण होऊन त्याद्वारे आय. आय. टी. संस्थांमधील संशोधन अधिक अर्थपूर्ण होईल, असा विश्वास वाटतो. खऱ्या अर्थाने हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला गरज आहे, ती अथकपणे प्रयत्न कार्य सुरूच ठेवण्याची आणि आज उपलब्ध आहे, त्यापेक्षा अधिक व्यापक अशा प्रणालींची!
आय. आय. टी. संस्थांमध्ये अभियांत्रिकी पदवीधरांनी अधिकाधिक प्रमाणात संशोधनाचे आणि अध्यापनाचे कार्य हाती घ्यायला हवे. संशोधनाचा उच्च दर्जा त्यावरच अवलंबून आहे. देशातील उच्च पातळीवरील तांत्रिक उपक्रमांचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आय. आय. टी.मधील ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही, जे अद्याप शिकत आहेत, त्यांना तसेच इतर संस्थांमधील विद्यार्थ्यांना पदवीच्या तिसऱ्या वर्षांपासूनच संशोधनकार्यात सहभागी करून घेणे गरजेचे आहे. आय. आय. टी. आणि बी. टेक.मधील एक विशेष गोष्ट म्हणजे मोठय़ा प्रमाणावरील उच्च दर्जाचे संशोधन करण्यासाठीचे शिक्षण! तेथील विद्यार्थ्यांना ही संधी फार लवकर दिली जाते. इतर संस्थांनीसुद्धा अशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.आपल्या देशात आज अभियांत्रिकी शिक्षणाचे चित्र, तोंडवळा कसा आहे? क्षमतेवर प्रचंड भार आणि दर्जा मात्र घसरता! याचा परिणाम म्हणजे आज राष्ट्रउभारणीसाठी आवश्यक असलेल्या अभियंत्यांची वानवा ही एक गोष्ट आणि दुसरे म्हणजे अभियांत्रिकी पदवीधारकांमध्ये निर्माण झालेले नैराश्य, उदासीनता!
ज्या संस्था चांगल्या प्रकारे चालत आहेत, त्या आय. आय. टी. संस्थांशी संलग्न केल्यास त्या संस्थांची वेगाने प्रगती होऊ शकेल, त्यांचा दर्जासुद्धा वाढेल.
जागतिक दर्जाच्या संस्थांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात मोठय़ा प्रमाणावर उच्च दर्जाच्या गुणांचा, ज्ञानाचा समन्वय असतो. कार्यक्षमता, विद्यार्थी, संस्था आणि अतिथी संशोधक, याशिवाय बाहेरील चांगल्या दर्जाच्या संस्थांशी सतत शैक्षणिक आणि संशोधनविषयक समन्वय, साधन-सामग्रीची यथायोग्य उपलब्धता अशी व्यवस्था या संस्थांमध्ये असते.
अत्यंत उपयुक्त प्रशासन व्यवस्था ही आणखी एक वैशिष्टय़पूर्ण बाब! विद्यार्थी- संशोधकांमधील नव्या आणि विश्वसनीय कल्पनांची जाण ठेवून त्यांना उत्तेजन देणारी, पाठिंबा देणारी अशी ही प्रशासन व्यवस्था अत्यंत उपयोगी ठरते.
आय. आय. टी. संस्थांची स्वायत्तता आणि त्यांना अर्थसाहाय्य या दोन गोष्टींकडे आज प्राधान्यक्रमाने लक्ष देणे आवश्यक आहे. दोन्ही गोष्टींचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
दर्जेदार संशोधनाला चालना, प्रोत्साहन, उत्तेजन देण्यामुळे आज प्रत्यक्ष डोळ्यासमोर नसलेल्या, निश्चित न केलेल्या नव्या क्षेत्रांमध्येसुद्धा जोमाने काम करण्याचा मार्ग सुकर होतो. तथापि, आय. आय. टी. संस्थांना पूर्ण स्वायत्तता दिल्याशिवाय हे शक्य नाही. कडक नियमांवर आधारित भूमिका घेणाऱ्या लोकांकडून आजच्या या आवश्यक गोष्टींना वेळीच योग्य, सकारात्मक प्रतिसाद मिळणे दुरापास्तच!सरकारी अर्थसाहाय्य मिळणाऱ्या संस्थांमध्ये आर्थिक स्वायत्तता आणण्यासाठीच एक मार्ग म्हणजे त्या संस्थांना स्वतंत्रपणे कारभार करण्यास मोकळीक देणे हा आहे. संस्थांची कार्यक्षमता, जबाबदारपणा आणि विश्वासार्हता या गोष्टी विविध विभागांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, दर्जा आणि केलेल्या संशोधनाचा दर्जा, याशिवाय राष्ट्रीय विकास, प्रगतीत दिले गेलेले योगदान आणि इतर तत्सम कसोटय़ा, निकष यांच्या आधारे निश्चित करता येऊ शकतील. सर्व गरजवंतांना सुलभ कर्जाची सुविधा उपलब्ध असावी. संपूर्ण अभ्यास आणि सखोल विचार केल्यानंतर ही योजना सहजशक्य असल्याचे लक्षात येते. तथापि, आय. आय. टी. संस्था जागतिक दर्जाच्या होण्याच्या दृष्टीने त्यांना कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण स्वायत्तता देणे अनिवार्य आहे..!