डॉ. वसंत गोवारीकर यांचा लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीतला एक उत्कृष्ठ लेख.
भारताने आपल्या लोकसंख्येवर कमालीचे नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे. भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला तीस वर्षांत मागे टाकेल, असे भाकित १९९१ सालच्या जनगणनेनंतर करण्यात आले होते. प्रत्यक्षात १९९१ पासून हा दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आज भारताची लोकसंख्या १.२१ अब्ज झाली आहे, तर चीनची १.३० अब्ज आहे. आता यापुढील काळात देशात असलेल्या लोकांच्या बुद्धिमत्तेचा वापर अधिक कार्यक्षमतेने कसा करायचा, यावर लक्ष केंद्रित करणे अधिक उपयुक्त ठरणार आहे.
नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रामन यांना मी १९६९ मध्ये अहमदाबादमध्ये भेटलो, तेव्हा ते म्हणाले होते की, भारताने जपानच्या पद्धतीने जायला हवे. माझ्याबरोबर तेव्हा विक्रम साराभाईही होते. डॉ. रामन म्हणाले की, हेन्री फोर्डने मोटारीचे उत्पादन सुरू केले खरे, पण अमेरिकेच्या बाजारपेठेत जपानमध्ये बनलेल्या मोटारींची संख्या काही कमी नाही. लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा आता एक मोठा देश बनू पाहातो आहे, हे खरे. पण आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, भारताने आपल्या लोकसंख्येवर कमालीचे नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे. अगदी विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये तरुणांचा आणि महिलांचा समावेश मोठय़ा प्रमाणावर असे. ही परिस्थिती अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत काही प्रमाणात अशीच होती. तेव्हा १० पैकी ९ जण गरीबच असायचे. गरिबीच्या परिघाबाहेर असणारा एखादा अपुऱ्या औषधयोजनेमुळे मृत्यूला सामोरा जात असे. गेल्या साठ वर्षांत ही परिस्थिती खूपच बदलली आहे. आज दहापैकी २.५ माणसेच गरीब राहिली आहेत. गरिबांची संख्या कमी झाली आहे. त्याच्या जोडीला औषधशास्त्रात कमालीची प्रगती झाली आहे आणि त्याचा परिणाम माणसाच्या जीवनमानावर होतो आहे.
पण असे असूनही डॉ. सी. व्ही. रामन यांच्यानंतर भारताला आजवर एकदाही विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळालेले नाही. आजही जगात सर्वत्र ‘रामन इफेक्ट’ची चर्चा होत असते आणि त्याचे कारण या देशातील हुशारी हे आहे. भारत हा जपानसारखा एक हुशार देश आहे आणि या देशातील हुशार लोकांनी त्यांच्या हुशारीचा कल्पकतेने उपयोग करून घ्यायला हवा, हे रामन यांचे म्हणणे मला नंतरच्या काळात पटू लागले, त्यांच्या बोलण्याचा नवा अर्थही समजू शकला. डॉ. रामन यांच्यानंतर आजवर एकही नोबेल पारितोषिक न मिळणे याचा अर्थ त्यांच्या त्या वक्तव्यात होता, हे मला नंतर उमगले. जपानचे दर माणशी उत्पन्न अमेरिकेतील माणसाएवढे झाले, ते केवळ तेथील लोकांच्या हुशारीमुळे. जे भारतीय हुशार आहेत, ते परदेशात जात आहेत आणि गेल्या काही काळात ज्या भारतीय वंशाच्या व्यक्तींना नोबेल मिळाले, ते या देशात राहून संशोधन करतच नव्हते. मुद्दा हा की, गेल्या सहा दशकांत भारतीय समाजात मोठय़ा प्रमाणात बदल झाले आहेत.
''गेल्या काही दशकांत आपण कुटुंब नियोजनासाठीची पाश्र्वभूमी लोकशाही मार्गाने तयार करण्यात यशस्वी झालेलो आहोत. ‘एकच मूल’ ही जुलमी आणि यांत्रिक योजना राबवून लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे सारे जग कौतुक करत असताना भारताने मात्र स्वयंप्रेरणेने त्यासाठी दिलेले योगदान कितीतरी महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. तसेच सरासरी आयुष्यमानही ६५ वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. हे भारताचे यश दुर्लक्ष करण्यासारखे निश्चितच नाही.''
नुकत्याच जाहीर झालेल्या जनगणनेच्या प्राथमिक माहितीमुळे भारतीय लोक भयचकित झालेले दिसत आहेत. भारताची लोकसंख्या सुमारे एक अब्ज २१ कोटी एवढी झालेली असताना मला मात्र त्याबाबत वेगळेच संकेत देणे आवश्यक वाटते. १९११ मध्ये भारताची लोकसंख्या २५.२ कोटी होती आणि त्यानंतरच्या दहाच वर्षांंनी ती २५.१ कोटी झाली होती. म्हणजे दहा लाखांनी कमीच झाली होती. १९४७ साली भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली, तरीही भारताची लोकसंख्या ३६.१ कोटी एवढी झाली होती. माझ्या मते भारतातील लोकसंख्यावाढीचा वेग कमी होत असल्याचे चित्र आहे. लोकशाही पद्धतीने हा वेग कमी होतो आहे, हे माझ्या दृष्टीने विशेष आहे.
१९९२ मध्ये मी ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चा अध्यक्ष असताना माझ्या अध्यक्षीय भाषणाचा विषय ‘विज्ञान, लोकसंख्या आणि विकास’ हा होता. त्याही वेळी भारताच्या लोकसंख्येचा वेग कमी होत आहे, या माझ्या विधानाने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. या विषयावर मी लिहिलेल्या ‘द इनएव्हिटेबल प्लस’ या पुस्तकावर अनेकांनी टीकाही केली. जगातल्या अनेक लोकसंख्या तज्ज्ञांनी या पुस्तकावर आपले अभिप्राय व्यक्त केले. भारताच्या लोकसंख्येबद्दल आशायदायक चित्र चितारणारा मी बहुधा पहिलाच असल्याने त्याबाबत चर्चा होणे स्वाभाविकच होते.
गेल्या काही दशकांत जन्मदरात घट होत असल्याचे आपल्याला दिसते आहे. त्यासाठी आवश्यक असणारी मानसिकताही तयार होत असल्याचे आपण पाहतो आहोत. काही दशकांपूर्वीपर्यंत मुले जगण्याचे प्रमाण इतके कमी होते, की त्यातली काही मुले तरी जगतील, म्हणून पुष्कळ मुले होऊ द्यावीत, हा विचारही आता मागे पडत चालला आहे. पाच-सहा वर्षे जगणारे कोणतेही मूल पुढील काळात जिवंत राहण्यासाठीचे वैद्यकीय ज्ञानही आता उपलब्ध झाले आहे. तसेच सरासरी आयुष्यमानही ६५ वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. हे भारताचे यश दुर्लक्ष करण्यासारखे निश्चितच नाही, असे मला वाटते.
कुटुंब नियोजनासारखे कार्यक्रम यापुढील काळात आवश्यकच नाहीत, असे माझे मुळीच म्हणणे नाही. परंतु लोकशाही मार्गाने गेल्या काही दशकांत आपण कुटुंब नियोजनासाठीची पाश्र्वभूमी तयार करण्यात यशस्वी झालेलो आहोत, हे मान्य करायला हवे. ‘एकच मूल’ ही जुलमी आणि यांत्रिक योजना राबवून लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे सारे जग कौतुक करत असताना भारताने मात्र स्वयंप्रेरणेने त्यासाठी दिलेले योगदान कितीतरी महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. भारतीय समाज मोठय़ा प्रमाणावर अशिक्षित आहे, असे सांगितले जाते. भारतीय पावसाच्या अंदाजावर अभ्यास करत असताना मी देशातल्या अनेक भागातील अशा अनेक ‘अशिक्षितां’शी बोललो होतो. तेव्हा मला हे स्पष्टपणे जाणवले होते, की वस्तुस्थिती तशी नाही. हा सारा समाज आपल्या ज्ञानाबाबत खूपच आग्रही आहे. या निरक्षरांनीच भारतीय लोकसंख्यावाढीचा वेग आणि मृत्युदर कमी करण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न केलेले आहेत, हे विसरून चालणार नाही. या प्रयत्नांची तुलना आता युरोपीय देशांशीही होऊ शकते, अशी स्थिती आहे. अशिक्षितांनाही आपले हित समजते आहे, याचा हा एक प्रकारचा पुरावाच आहे. जे निरक्षर शेतकरी स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशभरात साठ हजार टन खते वापरत होते, तेच शेतकरी आता लाखो टन खत वापरतात, हेही आपण पाहतो आहोत. अमेरिकेतील फक्त एक टक्का समाज संपूर्ण देशाच्याच नव्हे, तर अतिरिक्त अन्नधान्य पिकवण्याची जबाबदारी समर्थपणे पेलतो, त्या तुलनेत भारतातील शेतकऱ्यांच्या टक्केवारीत स्वातंत्र्यानंतर किती फरक पडला, हे आपण पाहायला पाहिजे. स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशात ९० टक्के जनता शेतकरी होती. आज साठ वर्षांनंतर ही टक्केवारी ६३ पर्यंत कमी झाली आहे.
भारत लोकसंख्येच्या बाबतीत तीस वर्षांत चीनला मागे टाकेल, असे भाकित १९९१ सालच्या जनगणनेनंतर करण्यात आले होते. तेव्हाही मी आशावादी होतो. मला भारताच्या लोकसंख्यावाढीचा दर लक्षणीयपणे खाली येण्याची चिन्हे दिसत होती. २०११ च्या जनगणनेनंतरची आकडेवारीही हेच सांगते की लोकसंख्या अपेक्षेपेक्षा कमी दराने वाढते आहे. पूर्वीच्या निकषांनुसार हा आकडा आता आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त असला असता. याचाच अर्थ लोकसंख्यावाढीचा वेग स्थिरावतो आहे, आणि काही प्रमाणात कमीही होत आहे. १९७१ पासून या प्रक्रियेला प्रारंभ झाला आणि १९८१ च्या जनगणनेत हे स्पष्ट झाले की लोकसंख्यावाढीचा वेग कमी होतो आहे. १९९१ पासून हा वाढीचा दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
भारत हा बुद्धिमान देश आहे. तेथील समाज खऱ्या अर्थाने हुशार आहे. ही हुशारी आणि बुद्धिमत्ता वापरण्याची मानसिकता यापुढील काळात आपण निर्माण करणे फार आवश्यक आहे. डॉ. सी. व्ही. रामन यांनी १९६९ मध्ये माझ्याशी बोलताना जे वक्तव्य केले होते, त्याचा अर्थ आता उमगतो आहे. भारताने लोकसंख्यावाढीच्या वेगावर नियंत्रण मिळवले, म्हणजे सारे काही झाले, असे समजणे चुकीचे आहे. यापुढील काळात भारताने आपली बुद्धिमत्ता उपयोगात आणण्यासाठी आपली सारी शक्ती खर्ची घातली पाहिजे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या १ सप्टेंबर २००६ च्या अंकात ब्रॅडस्टर यांनी असे भाकित केले होते की, २०३० पर्यंत भारत चीनला मागे टाकण्याची सुतराम शक्यता नाही. १९९१ मध्ये केलेल्या भाकितानुसार यंदा भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकायला हवे होते. परंतु भारताची लोकसंख्या १.२१ अब्ज झाली आहे, तर चीनची १.३० अब्ज आहे. देशात असलेल्या लोकांच्या बुद्धिमत्तेचा वापर अधिक कार्यक्षमतेने कसा करायचा, यावरच यापुढील काळात लक्ष केंद्रित करणे अधिक उपयुक्त ठरणार आहे.
No comments:
Post a Comment