Thursday, 9 February 2017

माझ्या मुलाला क्रिकेट कसं समजावून सांगू?

भारतीयांना परदेश गमन हे एका मादक अप्सरेसारखं वाटतं. नऊ वर्षांपूर्वी, मी सुद्धा फासे टाकले आणि हिंदी महासागर ओलांडून ऑस्ट्रेलियात स्थायिक झालो. जागा बदलली तरी स्वभाव बदलला नाही. क्रिकेटशी माझी नाळ जोडलेलीच राहिली. क्रिकेट ह्या खेळाविषयीचं प्रेम बहुदा आपल्या भारतीयांच्या डी.एन.ए. मध्येच आहे. अनुवांशिक आहे ते, जे पिढ्यानपिढ्या पुढे सरकत आलंय. पहिल्यांदा जेव्हा आपण बॅट किंवा बॉल हातात घेतो आणि त्या क्षणापासून आपण जे प्रेमात पडतो, ते प्रेम दाखवणं यश चोप्रा किंवा करण जोहरला पण जमणार नाही. "LOVE AT FIRST SIGHT' चे ह्यापेक्षा चांगले उदाहरण जगात नाही. गेली २५-२६ वर्ष क्रिकेटचा निस्सीम भक्त मी एका नव्या भूमिकेत शिरलो आणि काही महिन्यांपूर्वी बाबा झालो. बाप झाल्यापासून मी विचार करतोय कि, आपली भारतीयांची हि क्रिकेट विषयीची आस्था माझ्या ऑस्ट्रेलियात जन्माला आलेल्या मुलाला कशी समजावून देऊ.

शक्यतो, प्रत्येक भारतीय मुलाची स्पर्धात्मक क्रिकेटशी ओळख म्हणजे गल्ली क्रिकेट. एकाच मैदानात चाललेल्या अनेक मॅचेस, प्रत्येकाचं एकचं ध्येय - जिंकणे, कारण जिंकलेल्या टीमला पुढच्या मॅचला पहिली बॅटिंग मिळते. ट्रायल बॉल, एक टप्पा आऊट, कॉमन मॅन, काच फुटली तर आऊट, फेकी बॉलिंग आणि ह्या सारख्या अनेक गोष्टींना आम्ही जवळ केलं.

प्रत्येक पिढी क्रिकेटचा आस्वाद त्या त्या वेळच्या विशिष्ट अनुभवांवरून घेते. काहींना अजूनही जॉन अर्लोटची स्पष्ट कॉमेंटरी आठवत असेल, कोणाकडे स्वाक्षऱ्या मिळवण्यासाठी केलेल्या धडपडीचा गोष्टी असतील. स्टेडियममध्ये असतांना बहुतेक आपण सगळ्यांनीच बॉल आपल्या दिशेने यावा म्हणून मनातल्या मनात प्रार्थना केलीच असेल.

माझेही स्वतःचे अनुभव आहेत. मी सुनील गावसकरची बॅटिंग कधी बघितली नाही. कसं त्याने हेल्मेटशिवाय वेस्ट इंडियन फास्ट बॉलर्सचा सामना केला हे फक्त ऐकलंय किंवा वाचलंय. कपिल देवने मागे धावत जाऊन व्हिव रिचर्ड्सचा कॅच माझ्या जन्माच्या दोन वर्ष आधी घेतला. भारताचा पहिला वर्ल्डकप विजय पण मी अनुभवला नाही. जेव्हा मी बॅट धरायला शिकत होतो तेव्हा परदेशात टूर करताना भारत टेस्ट आणि वन डे दोन्हीमध्ये बिचकत बिचकत खेळत होता. मी त्या काळात मोठा झालो जेव्हा वन डे मध्ये २२० स्कोर केल्यावर टीम निवांत असायची.

मला क्रिकेट कळायला लागल्यापासून काही वर्ष भारतीय टीमच्या सामान्य कामगिरीने नाखुषच होतो. आणि मग अवतरला सचिन तेंडुलकर. आपण, क्रिकेटवेड्या भुकेल्या भारताने त्याला गिळून टाकला. त्याने केलेल्या प्रत्येक रनची माहिती आपल्याला होती आणि त्यात आपण प्रचंड भाव खाल्ला. त्याच्या बॅटिंगने सगळं क्रिकेट जगत हलवून टाकलं.

२१ व्या शतकाच्या सुरुवातीला झालेल्या मॅच फ़िक्सिन्ग प्रकरणांनी प्रत्येक क्रिकेट चाहता हादरला. GENTLEMEN'S GAME म्हणत म्हणत जाणारी ट्रेन रुळावरून घसरली होती. प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाबद्दल शंकेची पाल चुकचुकत होती. माझ्यासारख्या क्रिकेट भक्ताला प्रचंड चीटिंग केल्यासारखं झालं. हे म्हणजे समोरच्या बॅट्समनने आपल्याला एक रन काढण्यासाठी बोलवायचं, पण आपण अर्ध्यावर असताना जोरात NO म्हणायचं आणि आपण परत मागे क्रीजमध्ये पोचेपर्यंत फिल्डरने येऊन बेल्स उडवायच्या असं काहीतरी झालं.

क्रिकेट म्हणजे आठवणींचं एक पोतडं आहे - रडवणारे पराभव, आनंदाश्रू आणणारे विजय आणि नखं कुरतवडणाऱ्या उत्कंठावर्धक मॅचेस! कसं एका बंगाली प्रिन्सने लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये शर्ट गरागरा फिरवला होता, कसं दोन शांत, मृदू भारतीय बॅट्समननी अख्खा दिवस इडन गार्डन्सवर बॅटिंग करून अख्खी मॅच फिरवली होती, राऊंड द विकेट येऊन लेग स्पिन टाकणाऱ्या शेन वॉर्नला लेग स्टम्पच्या बाहेर स्टेप-आऊट करून कसं सचिनने शारजाला मैदानाबाहेर भिरकावून दिलं होतं (टोनी ग्रेगची ती कॉमेंटरी!). धोनी, विराट ह्या नवीन क्रिकेट देवांचा उदय आणि त्यांनी दिलेला तो च आश्वास आणि आपण टाकलेला तो च निश्वास! हे सगळं प्रचंड, अद्भुत आहे!

माझ्या मुलाची क्रिकेटशी ओळख हि खूप वेगळी असेल बहुदा इकडे. ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट लोकप्रिय आहे पण जेवढा त्यांचा 'फूटी (ऑस्ट्रेलियन रुल फुटबॉल)' लोकप्रिय आहे तेवढा नाही. तो, जो क्रिकेटबरोबरचा रोमान्स आहे तो इकडे नाही. ऍशेसचा इतिहास प्रचंड आहे. ब्रॅडमन, ट्रम्पर, चॅपल, वॉ, पॉन्टिंग इत्यादींची पुण्याईही आहे. पण तो जुनून, वेडेपणा नाही. ते मॅच जिंकल्यावर रस्त्यावर येऊन नाचणं, फटाके लावणं, उन्हाळ्याच्या सुट्टीत सकाळी ७ ते संध्याकाळी ७ नुसतं क्रिकेट खेळणं नाही. त्यामुळे जरा चिंता वाटते. जे आपण अनुभवलंय ते किती अद्भुत आहे आणि तेच ह्या पुढच्या पिढीला अनुभवायला मिळेल का नाही याची भीती वाटते.

त्रिशतक मारणं किंवा हॅट्रिक घेणं हे किती कमाल आहे. १९९९ साली कसं साऊथ आफ्रिकेने १ कॅच नाही तर अख्खा वर्ल्डकप ड्रॉप केला. लेग स्टॅम्पच्या बाहेर टप्पा पडलेला एक साधा लेग स्पिन 'शतकातला सर्वोत्कृष्ट बॉल' कसा झाला. डकवर्थ-लुईस अजून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. बिली बोवडेनच्या वाकड्या बोटाची शप्पथ मला कळतंच नाहीये कि, २०१३ मध्ये सचिनने वानखेडे पीचला वाकून नमस्कार केल्यावर प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात टचकन पाणी का आलं हे मी माझ्या मुलाला कसं समजावून देऊ? हे काम जेवढं रोमांचक आहे तेवढंच घाबरवणारं पण आहे. जास्त घाबरवणारं बहुतेक.

क्रिकेटचं भविष्य खूप उज्ज्वल आहे, मुख्यतः भारतात. गोऱ्या साहेबाचे करमणुकीचे साधन ते भारतातल्या अनेक धर्मांपैकी सर्वात मोठा धर्म. इंडिया इंडिया म्हणत सगळ्यांना एकत्र आणणारा आणि मुंबई इंडियन, चेन्नई सुपरकिंग, नाईट रायडर इत्यादी करत भांडणं लावणारा सुद्धा. मनोरंजक विरोधाभास आहे हा! विलक्षण असा हा क्रिकेटचा खेळ आणि विलक्षण त्याचा तो इतिहास! कसं सांगू मी माझ्या मुलाला? सुरुवात कुठून करू?