Saturday 30 July 2011

छोड आयें हम वो गलियाँ..!

लोकसत्ता ३० जुलै २०११

गिरीश कुबेर उत्कृष्ठ लेख

हल्ली मध्यमवर्गात एक तरी नातेवाईक, मित्र वगैरे कोणीतरी परदेशात असतो. आयटीवाला असेल तर अमेरिका, युरोपात असं कोण कोण असतात. अगदीच गेलाबाजार सिंगापूर किंवा दुबईत तरी असतंच ओळखीपाळखीचं. मग त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याच्या निमित्ताने एखादा तरी परदेश प्रवास होतो अनेकांचा. ल्यानंतर तिथल्या शिस्तीबद्दल, लोक कशी स्वच्छता पाळतात..गाडय़ा उगाच पों पों कशा करत नाहीत..पिवळा सिग्नल आला तरी गाडीवाले थांबतात..नाहीतर आपल्याकडे सिग्नल लालेलाल झाला तरी आपले लोक कसे गाडय़ा दामटतात..वगैरे चर्चा होतेच होते. आता आपल्याकडे काही सरकारने सांगितलेलं नसतं, सिग्नल हिरवा नसताना चौक ओलांडलाच पाहिजे म्हणून. पण तरी हे साधे नियम पाळणं देश म्हणून जमत नाही आपल्याला, हे आपण बघतच असतो. इतर कसे बेजबाबदार आहेत याचा फटका कधी ना कधी आपल्याला बसलेला असतो आणि आपल्या सामाजिक बेजबाबदारीचे चटके इतरांना सहन करावे लागलेले असतात. पण अर्थातच आपण सोडून सगळेच बेजबाबदार,असा प्रत्येकाचाच ठाम समज असल्याने परिस्थितीत काहीच बदल होत नाही.

पण विकसित जाऊ दे..अगदी दुबईत जरी आपला माणूस गेला तरी एकदम चित्र पालटतं. भारतातील वास्तव्यात शंभरातल्या वीस मार्काच्या वर न गेलेलं नागरिक शास्त्र सगळंच्या सगळं आपल्याला आठवायला लागतं आणि आपण सगळेच जबाबदार नागरिकासारखे वागायला लागतो.

हे सगळय़ाच क्षेत्रात होत असावं का? बहुधा हो. कारण पर्यटक म्हणून नाही तर व्यवसायात नाव कमवायची इच्छा असलेल्यालाही देशात राहण्यापेक्षा बाहेरच जाणं बरं वाटतं. तिथे सगळेच नागरिक शास्त्र पाळत असल्यामुळे असेल कदाचित. पण जगण्यातल्या फालतू, अनुत्पादक संघर्षांत वेळ जात नाही. त्यामुळे सगळी ऊर्जा चांगल्या कामावर केंद्रित करता येते, असं काही असावं का?

या क्षणाला आपले म्हणून गणलेले अनेक उद्योग देशापेक्षा बाहेरच जास्त गुंतवणूक करत असताना, या प्रश्नाचं उत्तर आपापल्या पुरतं का होईना, आपण शोधायची गरज आहे. टाटांसारख्या तद्दन भारतीय उद्योगाच्या एकूण उत्पन्नातला जवळपास ६० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पन्नाचा वाटा परदेशांतून येत असेल.तर इथं काहीतरी चुकतंय असं आपल्याला वाटायला हवं. दोनच दिवसांपूर्वी आपल्या उदयपूरच्या शुद्ध तुपातला शाकाहारी असा अंशू जैन हा ड्वाईशे बँक या अतिबलाढय़ जर्मन बँकेचा सहप्रमुख म्हणून नियुक्त झाला, त्यामुळे हा प्रश्न पुन्हा वर आलाय. जगात असं पहिल्यांदाच घडलंय की कोणीतरी बिगरयुरोपीय व्यक्ती अशी ड्वाईशे बँकेच्या प्रमुखपदावर नेमली गेलीय. आणि त्यातलं महत्त्वाचं म्हणजे अंशूला जर्मन भाषाही येत नाही. गेल्या महिन्यात त्याला जेव्हा कुणकुण लागली, आपली या पदावर नेमणूक होणार आहे म्हणून, तेव्हा त्यानं जर्मन भाषेची शिकवणी लावली. ते कळल्यावर जर्मन भाषासुद्धा न येणारा जर्मनीतल्या अतिबलाढय़ बँकेच्या प्रमुखपदी जाऊन बसतो, तेव्हा आता त्या देशातली शिवसेना-मनसे काय करणार, हा जसा प्रश्न पडतो तसाच त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो. तो असा- आज भारतातल्या अनेक समर्थ मंडळींना देशी कंपनी, देशी वातावरण यापेक्षा परदेशी कंपनी आणि तेथील वातावरण यात काम करून यशस्वी होणं जास्त सोपं वाटतंय, अशी परिस्थिती आहे काय?

आजमितीला जगातल्या त्या त्या क्षेत्रात सर्वोच्च अशा कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय आहेत. उदाहरणार्थ. अजय बांगा. हा मास्टर कार्ड कंपनीचा जागतिक पातळीवरचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. तसं बघायला गेलं तर बांगा कुटुंबातल्या दोन्ही मुलांनी नाव काढलं. थोरले विंडी बांगा. हिंदुस्तान लिव्हरची जी पालक कंपनी युनिलिव्हर..तिच्या एका शाखेचे प्रमुख होते ते. यांचे वडील आपल्या लष्करात उपप्रमुखपदापर्यंत पोहोचले. शिक्षण शुद्ध भारतीय वातावरणातच झालं. वडिलांच्या सारख्या बदल्या व्हायच्या, त्यामुळे आम्हाला नवनव्या वातावरणाशी जुळवून घ्यायची सवयच लागली आणि व्यवसायात वाढत गेल्यावर लक्षात आलं वाढण्यासाठी आपल्यापेक्षा बाहेरच जास्त वातावरण चांगलं आहे ते, असं बांगाबंधू सांगतात.

असं वाटून घेणारे बांगाबंधूच फक्त नाहीत. मोटोरोला मोबिलिटी या अशाच दुसऱ्या महामोठय़ा कंपनीचा प्रमुख आहे संजय झा. नोकियाच्या उदयानंतर मोटोरोलाचे वाईट दिवस आले. तेव्हा या कंपनीला पुन्हा वर काढण्याची जबाबदारी संजयकडे देण्यात आली. युरोपातल्या सगळय़ात मोठय़ा आणि मान्यवर अशा व्यवसाय आणि व्यवस्थापकीय शिक्षण संस्थेचा प्रमुख आहे दीपक जैन. अमेरिकेतल्या हॉर्वर्ड विद्यापीठाच्या व्यवसाय शिक्षण विभागाचे अधिष्ठाता आहेत नितीन नोऱ्हिया. वॉरेन बफेट अनेकांना माहीत असतात. त्यांची बर्कशायर हाथवे ही प्रसिद्ध गुंतवणूक कंपनी. त्या कंपनीचे प्रमुख आहेत अजित जैन. अनेक महत्त्वाचे गुंतवणूक निर्णय तेच घेत असतात आणि माझ्यानंतर तेच कंपनीचे प्रमुख असतील, असं खुद्द बफेट यांनी एकदा नाही तर अनेकदा जाहीर केलेलं आहे. गुगल माहीत नाही, असा या भूतलावर एखाद-दुसराच असेल. तो शोधायचा झाल्यास गुगलच्या सर्च इंजिनचीच मदत घ्यावी लागेल. असो. तर या गुगलचा व्यवसाय प्रमुख आहे निकेश अरोरा. याशिवाय पेप्सीच्या चेन्नईच्या इंद्रा नुयी, सिटी बँकेचे, आपले नागपूरवाले प्रमुख विक्रम पंडित, जगातल्या सगळय़ात मोठय़ा पोलाद कंपनीचे प्रमुख लक्ष्मी मित्तल.. असे अनेक सांगता येतील.

मुद्दा हा की अचानक जगभरातल्या कंपन्यांना भारतीयांचा शोध कसा काय लागला? यावर भिन्न मतं आहेत. भारतीयांनाच लक्षात आलं आपण आपल्या देशातून बाहेर पडायला हवं.. कारण देशात राहून फार काही वर जाता येणार नाही, हे एक. दुसरं मत असं की या कंपन्यांना जाणवलं की जगात अडचणींच्या महासागरात पोहण्यासाठीचा दमसास भारतीयांकडे आहे, तेव्हा भारतीयांनी या कंपन्यांकडे जाण्याच्या ऐवजी या कंपन्याच भारतीयांना शोधत आल्या. काहीही असो. तपशील महत्त्वाचा नाही. दिसतंय ते हेच की भारतीय बुद्धिमत्ता आणि जगभरातील खाजगी उद्योग हे एकाच समेवर एकमेकांना भेटले. एगॉन झेडर इंटरनॅशनल या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा शोध आणि पुरवठा करणाऱ्या कंपनीचे प्रमुख जिल एडर ताज्या ‘टाइम’ साप्ताहिकात या वाढत्या भारतीय ओघाविषयी बोलताना म्हणाले, कमालीच्या अडचणीतही कसं तगून राहायचं आणि मार्ग काढायचा याचं प्रशिक्षण भारतीयांना त्यांच्या देशात आपोआपच मिळतं. त्यामुळे उच्च पदांसाठी ते योग्य ठरतात. या एगॉनने जगातल्या बलाढय़ कंपन्यांचा आढावाच सादर केला. फॉच्र्युन किंवा स्टँडर्ड अँड पुअर या अग्रमानांकित मानांकन संस्थेच्या आकडेवारीनुसार आजमितीला भारतीय हे अमेरिकेच्या खालोखाल सगळय़ात जास्त कंपन्यांचे प्रमुख आहेत. जगात बलाढय़ अशा वेगवेगळय़ा क्षेत्रांतल्या सर्वोच्च अशा २५ कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय आहेत. आपल्या मागे आहे कॅनडा. त्यांचे चार जण आहेत या यादीत.

आता हे चांगलं की वाईट? वरवर पाहिलं तर पारंपरिक आशावादी हे कळल्यावर भारताचा अरुणोदय होतोय म्हणत सूर्यनमस्कारही घालतील. पण या भारतोदयामागची कारणं या आशावादाला झाकोळून टाकणारी आहेत. अत्यंत कटकटी, भ्रष्ट नोकरशाही, पायाभूत सुविधांचा पूर्ण अभाव आाणि वरून स्थानिक राजकारण्यांची दादागिरी अशांना तोंड देत पुढे जायची सवय भारतीयांना असतेच. त्यामुळे अनेक कंपन्यांना प्रमुखपदी भारतीय हवासा वाटतो, असं मत अनेक अभ्यासकांनी नोंदवलंय. भारतात एखादा कारखाना काढायचा झाला तर लागणाऱ्या परवान्यांची संख्या किमान ८२ आणि कमाल २०० पर्यंतही जाऊ शकते. आणि वर हे एकाच ठिकाणी सगळे परवाने मिळतायत, असंही नाही. ८२ परवान्यांची ८२ ठिकाणं. तरीही इथे माणसं उद्योगी राहतात, हेच विशेष. विकसित देशांत हा आकडा १० किंवा १५ पेक्षा जास्त नाही. तेही सगळे एकाच ठिकाणी. तेव्हा इतकं सहन केलेल्या भारतीयाला कोणतीच अडचण मोठी वाटत नाही, असं व्यवसाय अभ्यासकांचं मत आहे.

जगभरातल्या अनेक मॅरेथॉन स्पर्धात बऱ्याचदा इथियोपियन स्पर्धक विजयी होतात. यावर या गरीब आफ्रिकी देशानं अभिमान बाळगायचा का? या विजेत्या इथियोपियनांविषयी एकदा एक क्रीडा समीक्षक म्हणाला होता, अरे त्यांना उपाशीपोटी, काटय़ाकुटय़ांतून धावायची सवय असते त्यामुळे हे लोक या स्पर्धा जिंकतात.

आपण भारतीयांचं हे इतकं नाही, पण असंच काहीसं होऊ लागलेलं आहे का? तसंच असावं. आपल्याकडच्या खाचखळग्यांना तोंड देत जगण्यापेक्षा गुळगुळीत परदेशी वातावरणात प्रगती साधणं जास्त सोपं होत चाललंय. गुलजारच्या घनगहिऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर आपल्याकडे म्हणजे.. दिल दर्द का तुकडा है, पत्थर ही दली सी है.. एक अंधा कुवां है या बंद गली सी है..

त्यामुळेच मग ही मंडळी म्हणतायत.. छोड आयें हम वो गलियाँ..