Wednesday 28 July 2010

सुरूवात....

मराठी ब्लॉग लिहीण्यामध्ये मी अगदीच लिंबू-टिंबू आहे. प्रचंड मराठी ब्लॉग वाचले पण लिहावा अशी कधी वेळ आली नाही. वेळ आली नाही म्हणण्यापेक्षा वेळ मिळाला नाही म्हणणे योग्य ठरेल. माझी आई मला लहानपणापासून सांगायची "डाइरी लिही", पण खर तर काय लिही हे मी कधी समजून घेतलेच नाही. डाइरी लिही याचा अर्थ असा नाही की, "मी अमुक वाजता उठलो, तमुक वाजता मी लघु आणि दीर्घ-शंका केली, नंतर शाळेत गेलो वगैरे वगैरे". तिच्या "डाइरी लिही" ह्याचा खरा अर्थ मला आत्ता समजला की, महत्वाच्या घटनांची नोंद कर, चांगला चित्रपट बघितला, मस्त पुस्तक वाचला तर त्याचाबद्दल लिहून ठेव इ. इ. आता घरोघरी इंटरनेट आल, कंप्यूटरवर मराठी लिहिण्याची सोय झाली तर मग आता मी का गप्प बसू. ठीक आहे मला कंप्यूटरवर मराठी लिहिण्याची सवय नाही पण शाळेत प्रत्येकाने फळ्यावरच्या सुविचारांमध्ये एकदा तरी वाचल असेलच - "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे". त्याचाच बोध घेऊन म्हणणार आहे, "इंग्रजी अक्षरे दाबीता मराठीही उमटे".

आता ह्या ब्लॉगच नावच घ्या - कधी हे कधी ते. नावाशी प्रामाणिक राहण्याचाच प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे. म्हणजे काय तर एका कुठल्या गोष्टीला चिकटून न राहून अनेक विषयांत हात घालण्याची इच्छा आहे. तसा माझा अजुन एक ब्लॉग आहे - "http://www.natyasangeet.blogspot.com/". नाट्यसंगीत माझा अतिशय लाडका विषय, त्यामुळे मी तो ब्लॉग सुरू केला. संगीत नाटक बघताना अंगावर शहारे येतात माझ्या. पण नाट्यसंगीताप्रमाणे जगात अनेक विषय आहेत ज्यांबद्दल जितके लिहावे तितके थोडे आहे.

तर मी कुलकर्णी. बाबा टिपिकल देशस्थ आणि आई (माहेरची जोशी) टिपिकल कोकणस्थ, त्यामुळे माझ्यामध्ये देशस्थि शांत आणि कोकणस्थि खवचट रक्त वहातं. ह्या सगळ्याच प्रत्यंतर माझ्या नंतरच्या ब्लॉग-पोस्ट्स मध्ये येईलच.

मुद्द्याच लिहिण्यासाठी खरा तर काही मुद्दा नाही आहे. पहिलीच पोस्ट असल्यामुळे मनात जे येईल ते लिहीत सुटलोय. पु.ल. देशपांडे म्हणतात की, बोलायला मुद्दा नसलेला मनुष्य फार वेळ बडबडत बसतो. अस माझ्या हातून काही होऊ नये म्हणून लवकर आटपतो.

व्याकरणातल्या चुका कृपया दुर्लक्षित कराव्यात. मराठी टाइपिंग सुधारण्याचे प्रयत्न चालू आहेत.